Wednesday 30 December 2015

सर्वोत्कृष्ट मुदत विमा योजना - २०१६

आज आपण येणा-या २०१६ वर्षात मुदत विमा घ्यायचा झाल्यास कोणते चांगले पर्याय उपलब्ध आहेत याचा आढावा घेणार आहोत.

या आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे मुदत विमा किंवा टर्म प्लान हा विम्याचा सर्वात बेसिक आणि स्वस्त पर्याय आहे. तसेच टेक क्रांतीमुळे आता घरबसल्या सर्वोत्कृष्ट विमा खरेदी करणे सहजसोपे झाले आहे. सगळ्याच प्रमुख कंपन्यांनी त्यांच्या वेबसाइटवर मुदत विमा ऑनलाइन खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध केला असून या योजना एरवी ऑफलाइन खरेदी केल्या असता येणा-या खर्चापेक्षा तब्बल ३०-४० टक्क्यांनी स्वस्त आहेत. त्यामुळे आज तुम्ही हा लेख वाचत असताना ऑनलाइन व्यवहारांचे प्राथमिक ज्ञान जर असेल तर मुदत विमा हा ऑनलाइनच खरेदी करायचा हे निश्चित करून टाका.


प्रथम आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट विमा योजना निवडताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे यावर एक कटाक्ष टाकू.

१)    कंपनी व तिचा क्लेम सेटलमेन्ट रेशियो

तुम्ही नसताना तुमच्या वारसांना कोणताही त्रास न होता विम्याची रक्कम मिळणे ही नक्कीच आपली प्राथमिक अपेक्षा असेल. त्यामुळे विमा घेताना ही कंपनी खरंच आपल्या पश्चात वारशांना पैसे देईल का हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे विमा निवडताना कंपनीचे ब्रॅण्ड नेम हा एक प्रमुख घटक ठरतो.

खरंतर विमा व्यवसायात हे ब्रॅण्ड नेम किंवा कंपनीची कामगिरी जोखण्यासाठी आपल्याकडे आणखी एक मार्ग उपलब्ध असतो, तो म्हणजे क्लेम सेटलमेन्ट रेशियो. थोडक्यात सांगायचं तर कंपनीकडे १०० जणांनी विम्याचा दावा दाखल केल्यानंतर कंपनीने किती दावे मान्य करत विम्याची रक्कम अदा केली याची ही टक्केवारी. सो, ज्या कंपनीचा क्लेम सेटलमेन्ट रेशियो अधिक ती कंपनी अधिक विश्वासार्ह असा निष्कर्ष आपण काढू शकतो. पण याबरोबर हे ही लक्षात घ्या की संपूर्ण खरी माहिती पुरवली असता कोणतीही विमा कंपनी तुमचा दावा उगीच असा नाकारू शकत नाही. तसेच उपलब्ध क्लेम सेटलमेन्ट रेशियो हे सर्व प्रकारच्या विम्याचे एकत्रित असल्याने त्यातून मुदत विम्याचे पूर्ण चित्र स्पष्ट होत नाही.

तरी थोडक्यात सांगायचं तर किमान ९० टक्के क्लेम सेटलमेन्ट रेशियो असलेल्या नावाजलेल्या विमा कंपन्यांचाच आपण विचार केलेला चांगला. तसेच त्यातही तुमचा व्यक्तिश एखाद्या कंपनीवर जास्त विश्वास असेल तर तसे झुकते माप तुम्ही देऊ शकता. (इर्डा या विमा नियामक संस्थेच्या अद्ययावत नियमांप्रमाणे कोणतीही विमा कंपनी ३ वर्षे उलटून गेल्यावर विम्याचा दावा नाकारू शकत नाही)


२)  किंमत अर्थात हफ्त्याची रक्कम

या क्षेत्रातील अव्वल ४-५ कंपन्यांचा क्लेम सेटलमेन्ट रेशियो हा तुम्हाला साधारण ९० टक्क्यांच्या वरच असल्याचे दिसून येईल व त्यामुळे त्या मुद्द्यापेक्षा विम्याचा खर्च हा मुद्दा जास्त महत्त्वाचा ठरू शकतो. अर्थात ज्या कंपनीचा हफ्ता किंवा प्रिमिअम कमी असेल तेवढी तुमच्या खिशाची बचतच म्हणायला हवी.

 ३) इतर पर्याय (रायडर्स)

सर्वच विमा कंपन्या हल्ली मुदत विम्याबरोबर अधिकचा अपघात विमा किंवा दर ५ वर्षांनी वाढत जाणारे विम्याचे कवच असे अनेक विविध पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून देतात. कोणाची तशी विशिष्ट गरज असल्यास ठराविक कंपनीची योजना अधिक लाभदायी ठरू शकते. मात्र सर्वसाधारणपणे मुदत विमा घेताना कोणतेही रायडर्स न घेता ते स्वतंत्रपणे खरेदी करणे फायद्याचे ठरू शकते.




तक्त्यातील वार्षिक हफ्त्याची रक्कम ही ३० वर्ष वयाच्या निरोगी, नॉन स्मोकर पुरूषासाठी ३० वर्षांच्या पॉलिसीसाठी आहे. १ कोटी, ७५ लाख आणि ५० लाख अशा निरनिराळ्या विमा कवचासाठी विविध कंपन्यांचे प्रिमिअम्स दर्शवलेले आहेत.

तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे एलआयसी, एसबीआय, एच डी एफ सी लाइफ, आय सी आय सी आय लाइफ आणि मॅक्स लाइफ हे काही आघाडीचे पर्याय ऑनलाइन मुदत विमा योजनेसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय कोटक लाइफ, एगॉन रेलिगेअर अशा इतर कंपन्यांचे देखील आपापले टर्म प्लान्स आहेत.

किंमतीचा विचार केला असता यापैकी मॅक्स लाइफचे हफ्ते सर्वात स्वस्त तर एलआयसीचे सर्वात महाग असल्याचे लक्षात येईल. मात्र आपणास ठाऊक आहे की देशात सर्वाधिक क्लेम सेटलमेन्ट रेशियो हा एलआयसीचा आहे. (मॅक्सपेक्षाही स्वस्त पर्याय बाजारात उपलब्ध आहेत)


त्यामुळे आता शेवटी प्रश्न उरतो तो प्रत्येकाच्या वैयक्तिक पसंतीचा. क्लेम सेटलमेन्ट रेशियोचा मुद्दा लक्षात घेतला तरी व्यक्तिश मला एलआयसीचे प्रिमिअम जरा जास्त वाटतात. त्या तुलनेत इतरही नावाजलेल्या व मार्केटमध्ये आपली ब्रॅण्ड वॅल्ह्यू असलेल्या आयसीआयसीआय, एचडीएफसी, एसबीआयचे पर्याय चोखाळायला हरकत नाही. शेवटी फायनल चॉइस इज अपटू यू.

No comments:

Post a Comment