Tuesday, 19 January 2016

एम. एफ. यू. इंडिया – म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा राजमार्ग !

गेल्या १-२ वर्षांच्या काळात बदलत्या तंत्रज्ञानाने आर्थिक क्षेत्रात खूपच क्रांती घडवून आणली असं
म्हणावं लागेल. स्वस्त झालेले ऑनलाइन टर्म प्लान्स, हेल्थ इन्शुरन्स प्लान्स किंवा अगदी बॅंकेचे व्यवहार असोत, आपले आर्थिक व्यवहार पूर्वीच्या मानाने फारच सहजसोपे झाले आहेत.
या सगळ्यात एक हवाहवासा बदल आणि सहजसोपेपणा हवा होता तो म्युच्युअल फंड क्षेत्रात. अधुनिक काळातला गुंतवणुकीचा एक सर्वात महत्त्वाचा पर्याय असलेल्या म्युच्युअल फंड क्षेत्राने सुद्धा आता चांगलीच कात टाकली असून ऑनलाइन व्यवहारांशी गट्टी केली आहे.तसं पाहायला गेल्या वर्षापासूनच ब-याच म्युच्युअल फंड घराण्यांनी आपल्या संकेतस्थळावरून ऑलनाइन खरेदीची संधी उपलब्ध करून दिली होती. तसेच या क्षेत्राचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कॉमन केवायसीची प्रक्रिया. त्याबाबतीत त्यांनी बॅंकानांही मागे टाकून नवा पायंडा घालून दिलेला आहे जो ग्राहकांच्या दृष्टीने खूपच सुखकारक म्हणावा लागेल. आजघडीला एकदा केवायसी ची प्रक्रिया पार पाडली की आपण कोणत्याही म्युच्युअल फंड घराण्याबरोबर व्यवहार करायला सज्ज होतो.

त्यानंतर म्युच्युअल फंड क्षेत्रातील ग्राहकाभिमुख गोष्ट म्हणजे सर्वच फंड घराण्यांनी आणलेले डायरेक्त प्लान्स.  जेव्हा आपण कोणत्याही ट्रेडिंग प्लॅटफॉर्म द्वारे किंवा ब्रोकरमार्फत खरेदी करतो तेव्हा नकळत एक प्रकारचे ब्रोकरेज त्यात लपलेले असायचे. मात्र या क्षेत्रातील नियामक संस्थेने सर्व फंड घराण्यांना ग्राहक थेट फंड घराण्याकडून खरेदी करू शकतील असे डायरेक्ट प्लान्स सादर करणे अनिवार्य केले आणि सूज्ञ ग्राहकांना एक नवी संधी उपलब्ध करून दिली.

मात्र या डायरेक्ट प्लान्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी थेट त्या फंड घराण्याशी व्यवहार करावा लागायचा. मग त्यात तुम्हाला एक स्कीम आयसीआयसीआय, एक बिर्ला आणि एक एसबीआय अशी घ्यायची झाल्यास थोडेफार हेलपाटे मारावे लागायचे. तसेच प्रत्येक घराण्याचा वेगळा फोलिओ नंबर, त्याचा पासवर्ड असा बराच पसारा वाढायचा.

मात्र आता यावरही एक नंबर उतारा निघाला असून या सगळया कटकटीपासून तुमची सुटका झाल्यात जमा आहे. म्युच्युअल फंड क्षेत्रातील सर्वच धुरिणींनी एकत्र येऊन ग्राहकाभिमुख असे पाऊल उचलले असून त्यानुसार एम एफ युटिलिटी हा नवीन पर्याय ग्राहकांना मिळाला आहे.

एम एफ युटिलिटी म्हणजे नेमकं काय ?

एम एफ युटीलिटीच्या मार्फत तुम्ही एकच कॉमन अकाऊंट नंबर कॅन उघडू शकता, ज्यामुळे तुम्हाला विविध फंड घराण्याचे असंख्ये फोलिओ नंबर लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही.
या कॉमन अकाऊंटमधून तुम्ही ऑलमोस्ट सगळ्या प्रमुख म्युच्युअल फंडांच्या सगळ्या स्कीम्समध्ये गुंतवणूक करू शकता, ते ही अगदी घरबसल्या. १ जानेवारी २०१६ पासून एम एफ युटिलिटीने बहुप्रतिक्षित ऑनलाइन पोर्टल सुद्ध कार्यान्वित केलेले आहे.

एम एफ युटिलिटीची खासियत काय ?

सर्वात महत्त्वाचं म्हणजे एम एफ युटीलिटीने सर्व स्कीम्सचे डायरेक्ट प्लान्स सुद्धा उपलब्ध करून दिले आहेत, ज्याद्वारे आपण कमीतकमी खर्चात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतो. थोडक्यात फंड मॅनेजमेन्ट फी जी एन ए व्ही मधून आधीच वजा केलेली असते ती सोडता या गुंतवणुकीसाठी आपल्याला दुसरा कोणताचा खर्च करायचा नाहीये. कॅन उघडण्यापासून ऑनलाइन पोर्टलच्या सर्व सुविधा अगदी चकटफू उपलब्ध आहेत.

त्यामुळे, गुंतवणुकीचं ज्ञान असेल किंवा योग्य सल्ला मिळत असेल तर त्यानंतर गुंतवणुकीचं माध्यम म्हणून आतापार्यंतचा सगळ्यात किफायतशीर आणि वापरायला सोपा असा पर्यात एम एफ युटिलिटीच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेला आहे यात तीळमात्र शंका नाही.
त्यामुळे तुम्ही आधीच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल किंवा नव्याने करू इच्छित असाल तरी यावर्षात पहिलं काम करायचं ते म्हणजे कॅन अर्थाच म्युच्युअल फंडासाठीचं कॉमन अकाउंट उघडून घ्यायचं.

एम एफ युटिलिटू संदर्भातील सर्व माहिती त्यांच्या संकेतस्थळावर सविस्तरपणे दिलेली आहे.
संकेतस्थळ – www.mfuindia.com

No comments:

Post a Comment