Tuesday 29 December 2015

अर्थ नियोजनाची बाराखडी



नाही म्हटलं तरी आर्थिक नियोजन किंवा फायनान्शियल प्लानिंग हा आपल्याकडे तसा दुर्लक्षित केला गेलेला विषय. म्हणजे गंमत अशी की पैसा पैसा म्हणत त्यासाठी आपण दिवसरात्र राब राब राबायचं. मात्र तो खर्च करताना किंवा त्याचं नियोजन करण्यासाठी मात्र अजिबात कष्ट घ्यायचे नाहीत हे सर्वसाधारणपणे आढळणारं चित्र आहे.

पूर्वीच्या काळात एकवेळ ठीक होतं. पण एकविसाव्या शतकाच्या तंत्रयुगात आता सगळ्यांच्याच हातात पैसा खुळखुळू लागलाय. तेव्हा त्याचं योग्य नियोजन करणं क्रमप्राप्त आहे. किंबहुना आपल्याला मिळणारे पैसे कमी आहेत असं जर कोणाला वाटत असेल तर उलट त्या व्यक्तीला आर्थिक नियोजनाची आणखी जास्त गरज आहे असं समजायला हरकत नाही.


तर आज आपण वैयक्तिक अर्थ नियोजनाची तोंड ओळख करून घेताना साधारण तीन वर्गांत त्याचे वर्गीकरण करूयात.

१) विमा किंवा इन्शुरन्स
२) गुंतवणूक
३) कर नियोजन





१) विमा किंवा इन्शुरन्स -

विम्याचा विचार करताना अर्थात त्यात जीवित विमा आणि आरोग्य विमा (मेडिक्लेम) या दोन गोष्टींचा अंतर्भाव होतो.
आईबाबांनी कोणे एके काळी माझ्या नावावर २-३ एल आय सी पॉलिसी काढल्या आहेत म्हणजे माझा विमा आहे असे समजायचे कारण नाही. कारण या प्रकारातल्या बहुतेक सर्व पॉलिसी या पारंपारिक एन्डाऊमेन्ट किंवा मनीबॅक प्रकारातल्या असतात. थोडक्यात ना धड विमा आणि ना धड गुंतवणूक अशी या एलआयसी पॉलिसींची गत. (त्याकाळी दुसरे पर्यायही कमी होते ही गोष्ट निराळी) मात्र किमान आता तरी आपण या जुन्या विचाराला केराची टोपली दाखवून विमा या विषयाला गांभीर्याने घेणे गरजेेचे आहे.

उंचावलेले आर्थिक उत्पन्नत्या उत्पन्नानुसार अंगवळणी पडलेली लाइफस्टाइल.. नित्यनेमाचे झालेले गृहकर्जवाहनकर्ज या सगळ्या पार्श्वभूमीवर जीवित विम्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे.

जीवित विम्याची एका वाक्यात सरळ साधी व्याख्या करायला गेलो तर अगदी दुर्दैवाने आपल्या जीविताचे काही कमी अधिक झाल्यास भविष्यातील आपल्या उर्वरित आर्थिक उत्पन्नाची आपल्या कुटुंबाला भरपाई करून देणारा मोबदला असं म्हणता येईल.

तेव्हा हा मोबदला खरंच आपल्या उत्पन्नाला साजेसा आहे का हे पाहणं अतीव गरजेचं असतं.

थंब रूल किंवा सर्वसाधारण विचार असा मांडला जातो की तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या १५-२० पट इतके तुमचे जिवित विम्याचे कवच असावे. उदा. कोणाचे वार्षिक उत्पन्न ५ लाख असेलतर साधारणपणे त्याला १ कोटीचे विमा कवच असावे असे अपेक्षित आहे.

तेव्हा माझ्या भरपूर एल आय सी पॉलिसी आहेत असा विचार करणा-यांनी एकदा त्या सर्व पॉलिसीज काढून त्यातील सम अॅश्युअर्ड या लेबलखालील आकड्यांची बेरीज करावी आणि आपले विमा कवच पुरेसे आहे का ते ठरवावे.

योग्य जीवन विमा पॉलिसी कशी खरेदी करावी हे आपण पुढील लेखांत सविस्तरपणे पाहूच.

पुढे जाऊन जीवन विम्यासोबतच तुमचा व तुमच्या कुटुंबाचा आरोग्य विमा असणे आजच्या काळात तितकेच गरजेेचे ठरते. रुग्णसेवा क्षेत्रातील दररोज वाढणा-या किंमती पाहता आरोग्य विमा नसणे हे एखाद्या प्रसंगी तुमची आयुष्यभराची गुंतवणूक पुंजी संपवू शकते.


२) गुंतवणूक

गुंतवणुकीसाठी आज बाजारात बॅकेच्या फिक्स डिपॉसिट्सरिकरिंग डिपॉसिट्स,..पीपीएफएनएससीपोस्टाच्या योजना या पारंपारिक प्रकारांसोबतच म्युच्युअल फंडांसारखे अनेक नवीन व अधिक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. लक्षात ठेवाएल आय सी पॉलिसी मध्ये गुंतवलेली कितीही मोठी रक्कम ही तुमची गुंतवणूक म्हणणे थो़ेेडे धाडसाचे ठरू शकते. कारण मुळात ती गुंतवणूक नसून एक प्रकारचा विमा आहे व त्यावरील मोबदला हा महागाई दरापेक्षा फारच कमी आहे. त्यामुळे सरप्लस किंवा अधिकचे उत्पन्न ही तर दूरची गोष्ट.

गुंतवणूक हा तसा फारच सविस्तर आणि न संपणारा विषय..

त्यामुळे आतापुरतं सांगायचं झालं तर गुंतवणुकीचा यशस्वी फंडा हा तुमच्या नियोजनात आहे. गुंतवणूक ही नेहमीच तुमच्या जोखीम घेण्याच्या प्रवृत्तीशी आणि ज्या गोष्टीसाठी किंवा गोलसाठी आपण गुंतवणूक करतोय त्याच्याशी सुसंगत असावी.

लक्षात ठेवाकमीत कमी जोखीम घेऊन जास्तीत जास्त रिटर्न्स किंवा मोबदला देणारी कोणतीही स्कीम या जगात अस्तित्वात नाही.

जोखीम आणि त्या मोबदल्यातील नफा हे नेहमीच हातात हात घालून चालतात हे लक्षात राहू द्या.


३) कर नियोजन

बाकी नियोजनाबद्दल कितीही अनास्था असलीतरी फक्त सरकारला कर द्यायचा नाही म्हणून हा विषय मात्र  तसा आपल्या चांगलाच आवडता. पण त्यातही पुरेशा योग्य मार्गदर्शनाअभावी आपला पाय खोलातच गेलेला असतो.
लक्षात ठेवाकर नियोजन हा विषय कधीच स्वतंत्रपणे पाहता कामा नये. परंतु तुमचे ओव्हरऑल आर्थिक नियोजन करतानाच हा पैलू देखील तितकाच महत्त्वाचा आहे एवढं मात्र खरं.
योग्य कर नियोजन करून १० टक्के कर व्याप्तीत येणारी व्यक्ती किमान १५ हजारांपर्यंत आपली कर बचत करु शकते.



No comments:

Post a Comment