Tuesday 19 January 2016

एम. एफ. यू. इंडिया – म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा राजमार्ग !

गेल्या १-२ वर्षांच्या काळात बदलत्या तंत्रज्ञानाने आर्थिक क्षेत्रात खूपच क्रांती घडवून आणली असं
म्हणावं लागेल. स्वस्त झालेले ऑनलाइन टर्म प्लान्स, हेल्थ इन्शुरन्स प्लान्स किंवा अगदी बॅंकेचे व्यवहार असोत, आपले आर्थिक व्यवहार पूर्वीच्या मानाने फारच सहजसोपे झाले आहेत.
या सगळ्यात एक हवाहवासा बदल आणि सहजसोपेपणा हवा होता तो म्युच्युअल फंड क्षेत्रात. अधुनिक काळातला गुंतवणुकीचा एक सर्वात महत्त्वाचा पर्याय असलेल्या म्युच्युअल फंड क्षेत्राने सुद्धा आता चांगलीच कात टाकली असून ऑनलाइन व्यवहारांशी गट्टी केली आहे.

Wednesday 30 December 2015

सर्वोत्कृष्ट मुदत विमा योजना - २०१६

आज आपण येणा-या २०१६ वर्षात मुदत विमा घ्यायचा झाल्यास कोणते चांगले पर्याय उपलब्ध आहेत याचा आढावा घेणार आहोत.

या आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे मुदत विमा किंवा टर्म प्लान हा विम्याचा सर्वात बेसिक आणि स्वस्त पर्याय आहे. तसेच टेक क्रांतीमुळे आता घरबसल्या सर्वोत्कृष्ट विमा खरेदी करणे सहजसोपे झाले आहे. सगळ्याच प्रमुख कंपन्यांनी त्यांच्या वेबसाइटवर मुदत विमा ऑनलाइन खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध केला असून या योजना एरवी ऑफलाइन खरेदी केल्या असता येणा-या खर्चापेक्षा तब्बल ३०-४० टक्क्यांनी स्वस्त आहेत. त्यामुळे आज तुम्ही हा लेख वाचत असताना ऑनलाइन व्यवहारांचे प्राथमिक ज्ञान जर असेल तर मुदत विमा हा ऑनलाइनच खरेदी करायचा हे निश्चित करून टाका.

Tuesday 29 December 2015

विमा का घ्यावा किंबहुना मुदत विमाच (टर्म प्लान) का घ्यावा ?



बहुसंख्य आर्थिक नियोजनकारांच्या मते परिपूर्ण आर्थिक नियोजनाची सुरूवात ही पुरेशा विमा कवचाने होते. कारण बाकी सगळं सुरळीत असून सुद्धा एखादी अकस्मात दुर्दैवी घटना संपूर्ण कुटुंबाची आर्थिक घडी बिघडवू शकते. तेव्हा घरातील कमावत्या व्यक्तीचा जीवन विमा उतरवणे ही आर्थिक नियोजनातील पहिली पायरी ठरावी.

काही वर्षांपूर्वीपर्यंत जीवन विमा या क्षेत्रात केवळ एल आय सी ची मक्तेदारी होती. मात्र त्यानंतर अनेक खासगी कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आणि विमा विश्वाचे चित्रच बदलून गेले. महागड्या पारंपारिक विमा योजना अनेक विमा संरक्षण आणि गुंतवणूक या दोन्ही आघाड्यांवर कमकुवत ठरत असताना या नवीन कंपन्यांनी तसेच आता एल आय सी ने देखील स्वस्त व मस्त अशा ऑनलाइन टर्म प्लान किंवा मुदत विम्याच्या पॉलिसी आणत या क्षेत्रात एक वेगळीच क्रांती घ़डवून आणली आहे.

अर्थ नियोजनाची बाराखडी



नाही म्हटलं तरी आर्थिक नियोजन किंवा फायनान्शियल प्लानिंग हा आपल्याकडे तसा दुर्लक्षित केला गेलेला विषय. म्हणजे गंमत अशी की पैसा पैसा म्हणत त्यासाठी आपण दिवसरात्र राब राब राबायचं. मात्र तो खर्च करताना किंवा त्याचं नियोजन करण्यासाठी मात्र अजिबात कष्ट घ्यायचे नाहीत हे सर्वसाधारणपणे आढळणारं चित्र आहे.

पूर्वीच्या काळात एकवेळ ठीक होतं. पण एकविसाव्या शतकाच्या तंत्रयुगात आता सगळ्यांच्याच हातात पैसा खुळखुळू लागलाय. तेव्हा त्याचं योग्य नियोजन करणं क्रमप्राप्त आहे. किंबहुना आपल्याला मिळणारे पैसे कमी आहेत असं जर कोणाला वाटत असेल तर उलट त्या व्यक्तीला आर्थिक नियोजनाची आणखी जास्त गरज आहे असं समजायला हरकत नाही.


तर आज आपण वैयक्तिक अर्थ नियोजनाची तोंड ओळख करून घेताना साधारण तीन वर्गांत त्याचे वर्गीकरण करूयात.

१) विमा किंवा इन्शुरन्स
२) गुंतवणूक
३) कर नियोजन


परिचय...

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो...

ब्लॉगर विश्वातली ही माझी दुसरी इनिंग.. 

माझ्याबदद्ल सांगायचं तर मी एक अस्सल मुंबईकर मराठमोळा तरूण. सध्या वित्तीय सेवा क्षेत्रात कार्यरत आहे.

काही तांत्रिक कारणांनी मला माझं नाव मात्र गुलदस्त्यातच ठेवणं भाग आहे. त्याबद्दल क्षमस्व!

नोकरी निमित्ताने बॅंकिंग आणि फायनान्सचा खूप जवळून परिचय झालाय किंवा होतोय. त्यापैकी माझा सर्वात जास्त जिव्हाळ्याचा विषय ठरलाय तो म्हणजे "पर्सनल फायनान्शियल प्लानिंग".

इंग्रजीत पर्सनल फायनान्शियल प्लानिंग या विषयाला वाहिलेले अनेक ब्लॉगर्सतज्ञांचे ब्लॉग पाहण्यात आले. मात्र दुर्दैवाने मराठीत मात्र असा कोणताच ब्लॉग सापडला नाही. त्यामुळे ब-याच दिवसांपासून हा असा ब्लॉग लिहिण्याची इच्छा होती. अखेर आज शुभारंभ करतोय. माझ्याजवळ असलेल्या माहितीचा किंवा कौशल्याचा जास्तीत जास्त लोकांना उपयोग व्हावा व आपल्या समाजात आर्थिक साक्षरता वाढावी हा एकमेव उद्देश या ब्लॉगमागे आहे.