Tuesday 29 December 2015

विमा का घ्यावा किंबहुना मुदत विमाच (टर्म प्लान) का घ्यावा ?



बहुसंख्य आर्थिक नियोजनकारांच्या मते परिपूर्ण आर्थिक नियोजनाची सुरूवात ही पुरेशा विमा कवचाने होते. कारण बाकी सगळं सुरळीत असून सुद्धा एखादी अकस्मात दुर्दैवी घटना संपूर्ण कुटुंबाची आर्थिक घडी बिघडवू शकते. तेव्हा घरातील कमावत्या व्यक्तीचा जीवन विमा उतरवणे ही आर्थिक नियोजनातील पहिली पायरी ठरावी.

काही वर्षांपूर्वीपर्यंत जीवन विमा या क्षेत्रात केवळ एल आय सी ची मक्तेदारी होती. मात्र त्यानंतर अनेक खासगी कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आणि विमा विश्वाचे चित्रच बदलून गेले. महागड्या पारंपारिक विमा योजना अनेक विमा संरक्षण आणि गुंतवणूक या दोन्ही आघाड्यांवर कमकुवत ठरत असताना या नवीन कंपन्यांनी तसेच आता एल आय सी ने देखील स्वस्त व मस्त अशा ऑनलाइन टर्म प्लान किंवा मुदत विम्याच्या पॉलिसी आणत या क्षेत्रात एक वेगळीच क्रांती घ़डवून आणली आहे.

मुदत विमा किंवा टर्म प्लान म्हणजे काय ?

विमा असलेल्या व्यक्तीचा कोणत्याही कारणाने दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या पश्चात वारसांना विम्याची एक ठराविक रक्कम मिळणे असे या मुदत विम्याचे किंवा टर्म प्लानचे सरळसाधे स्वरूप असते. त्यासाठी दर वर्षाला किंवा ठराविक कालांतराने त्या विम्याचा हफ्ता आपण भरणे आवश्यक असते. या मुदत विम्यामध्ये बाकी कोणतीही किचकट आकडेमोड नाही. तुमचा वार्षिक हप्ता किंवा प्रिमिअम आणि विमा कवच रक्कम म्हणजे सम अश्युअर्ड या दोन आकड्यांकडे फक्त आपण लक्ष देणे आवश्यक आहे. याशिवाय कंपनीचा क्लेम सेटलमेन्ट रेशो हा सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरू शकते. त्याबद्दल पुढे सविस्तर.

मुदत विमाच का ?

आतापर्यंत तुम्ही ज्या एल आय सी च्या विमा पॉलिसी पाहिल्या असतील त्यात तुम्ही हप्ता भरल्यावर काही कालांतराने काही रक्कम पुन्हा तुम्हाला मिळायची तरतूद पाहिली असेल. तसेच विमाधारकाचा मृत्यू झाल्यास वारसाला विम्याची रक्कम मिळणार. पुन्हा वर करात सवलत. अशी तिहेरी फायद्याची जाहिरात करत अनेक एजंट्सनी काही कुचकामी पॉलिसीज् तुमच्या माथी मारल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु यातील ग्यानबाची मेख अशी की या तीन पैकी कोणतेच काम या पॉलिसी धड करीत नाहीत. विमा कवच म्हणाल तर ते अगदीच मामुली असल्याचे तुमच्या लक्षात येईल. आणि मुदत तरून गेल्यावर पैसे पुन्हा मिळणार असं म्हणत असाल तर तो परताव्याचा दर हा महागाई दरापेक्षा कमी भरतो. (जास्तीत जास्त ४ ते ६ टक्के).


तर सांगायचा मुद्दा हा की मुदत विमा प्रकारात तुम्हाला तुम्ही भरलेल्या हप्त्यांमधील १ पैसाही पुन्हा रिटर्न मिळत नाही.

अरेच्चा...
काय झालं.. दचकलात... मग काय कामाची ही विमा पॉलिसी असा विचार आला मनात नाही थोडे स्वाभाविक आहे तसं वाटणं. पण खोलात गेल्यावर लक्षात येईल की तेच खरं तर आपल्या फायद्याचं आहे. आणि तोच खरा विम्याचा मूळ प्रकार आहे. थोडीशी रक्कम देऊन आपल्या पश्चात आपल्या प्रियजनांसाठी पुरेशा रकमेची तरतूद करून ठेवणे हा त्यामागचा खरा उद्देश अाहे.

कारण जी पॉलिसी तुम्हाला पैसे रिटर्न देतेय ती अर्थात काही धर्मादाय करण्यासाठी बसलेली नाही. त्याची पुरेपूर किंबहुना जास्तच किंमत ती तुमच्याच कडून अव्वाच्या सव्वा हप्ता स्वरूपात वसूल करून घेते आहे.
याऊलट मुदत विम्यात मात्र नाममात्र हप्ता आकारून तुम्हाला तुमच्या गरजेएवढं पुरेसं विमा कवच मिळण्याची सोय आहे.
याचसंदर्भात एक उदाहरण पाहूया.

समजा तुम्ही तुमच्या मनीबॅक किंवा तत्सम दुहेरी लाभ देणा-या पॉलिसीसाठी वार्षिक २०००० रुपये हप्ता भरताय.
यात तुम्हाला रु २ लाखांचे विमा कवच मिळत आहे.
आणि ३० वर्षे हप्ता भरल्यानंतर तुम्हाला समजा तुम्ही भरलेले ६ लाख रुपये आणि वर बोनस वगैरे नावाने समजा आणखी ४ लाख रु सुद्धा मिळणार आहेत. असे एकूण १० लाख रिटर्न.
आकर्षक वाटतेय ना योजना. पण सत्य परिस्थिती मात्र वेगळी आहे. योग्य नियोजन केलेत तुम्ही यापेक्षा कित्येक पटीने जास्त नफा कमवू शकता.

अट एकच.

विमा आणि गुंतवणूक या दोन गोष्टी नेहमी एकमेकांपासून स्वतंत्र ठेवायच्या. विमा हा जोखमीपासून संरक्षणासाठी आहे तर गुंतवणूक ही संपत्ती वृद्धीसाठी आहे हे लक्षात असू द्या.

तर आता दरवर्षी तुम्ही हे जे २०००० गुंतवताय ते जरा वेगळ्या प्रकारे खर्च करून पाहूयात.

या २०००० पैकी निव्वळ ५००० रु देऊन तुम्हाला ५० लाख रुपये विमा कवच मिळणार आहे (चक्क पंचवीस पट)
आणि समजा उरलेले १५००० रु तुम्ही अगदी पीपीएफ मध्ये जरी ठेवलेत तरी ३० वर्षांच्या अखेरीस किती रक्कम जमेल काही अंदाज ?
तर चक्क २० लाख.

म्हणजे तेच १०००० रु गुंतवून मी २ लाखांऐवजी ५० लाखांचे विमा कवच मिळवले आणि ३० वर्षांअखेरीच १० लाखांऐवजी त्याच्या किमान दुप्पट रक्कम सद्धा रिटर्न. खरंतर हे सगळे पैसे पीपीएफ मध्ये न टाकता योग्य गुंतवणूक केली तर ही रक्कम अगदी ३०-३५ लाखांपर्यंत जाऊ शकते.

असो. खरंतर मी हे सगळे आभासी आकडे मांडले. पण त्याने सत्य मात्र बदलत नाही.

मुदत विमा घेऊन विमा आणि गुंतवणूक या दोन गोष्टी स्वतंत्र केल्याने तुम्ही विमा कवच रक्कम आणि गुंतवणूकीतून मिळणारा मोबदला या दोन्ही आघाड्यांवर पारंपारिक मनीबॅक पॉलिसींवर अगदी पटींमध्ये मात करणार आहात.

मग ठरलं का मुदत विमा घेऊन आपल्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करण्याचं?

किती रक्कमेचा विमा घ्यावा.. किती कालावधीसाठी घ्यावा.. कोणी घ्यावा आणि कोणत्या कंपनीकडून घ्यावा हे सगळं पुढील पोस्टमध्ये.

No comments:

Post a Comment